♦सिलेंडर गेला अडगळीत…
♦लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगांव
ग्रामीण भागातील गोरगरीब तथा शहरी भागातील बहुतांश घरी सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सिलेंडरच्या महागाई पेक्षा चुलीचा धुरच बरा म्हणत महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळल्या असुन रिकामा सिलेंडर अडगळीत गेला असल्याने ता. ८ मार्च रोजी शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात स्थानिक मार्डी चौकात निषेध व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील महिलांना धुरा पासून मुक्ती देण्यासाठी आणि प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने सन २०१६ मध्ये संपुर्ण देशात उज्वला गॅस योजना सुरु केली. या योजनेला ग्रामीण महिलांनी भरघोस पाठींबा दिल्याने अल्पावधितच ही योजना लोकप्रिय ठरुन अनेक महिलांची धुरा पासून मुक्ती झाली.
आता मात्र या योजनेच्या लाभार्थी असलेल्या गरीब कुटुंबांना गॅसच्या वाढत्या किंमती परवडणाऱ्या नसल्याने गॅस सिलेंडर अडगळीत टाकुन चुली पेटवाव्या लागल्या आहे . एकीकडे रॉकेल बंद झाले तर दुसरीकडे गॅस महाग झाल्याने ग्रामीण महिलांची कोंडी झाली आहे.
सरकारने पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत गॅस सिलेंडर मोफत दिले. नंतरची रिफिलींग ग्राहकांना करायची होती. परंतु सिलेंडर चे दर गगनाला भिडल्याने महागाई पेक्षा धुर बरा म्हणत या महिला परत चुली वरील स्वयंपाक करण्याकडे वळल्या.दिवसेंदिवस होत असलेली सिलेंडर दरवाढ ही सर्वसामान्याना आर्थिक दृष्ट्या न झेपणारी आहे. यावर्षी महापुराने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थती असुन शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने शिवसेना (ठाकरे गट) शिवसेना प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सुनिल गेडाम, मयुर ठाकरे, नगराध्यक्ष मनिष मस्की, नगरसेवका माला बदकी, वर्षा किंगरे, मनोज वादामुळ, गणेश आसुटकर, गुरुदास घोटेकर, चंद्रशेखर थेरे, खुशाल येरगुडे, यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
