– शाळा-महाविद्यालयीन परिसरात चिडीमारीत वाढ
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
शहरात दिवसेंदिवस रोडरोमियोंचा उच्छाद वाढत असल्याने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनीना,महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.आपले शिक्षण,शाळा, नोकरी बंद होईल या भितीने मुली ‘हा’ प्रकार पालकांना न सांगता निमूटपणे सहन करत असल्याने या रोडरोमियोंना चांगलेच रान मोकळे झाल्याचे वास्तव आहे.
एका दुचाकीवर डबल-ट्रिपल सीट बसून जोरजोरात कर्कश आवाज करत हॉर्न वाजवत मुलींचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणे,मुलींना भरधाव वाहन चालवत कट मारून निघून जाने,अचकट विचकट आवाज काढणे,मुलींना पाहून अश्लील हावभाव करणे असले किळसवाणे प्रकार या टवाळखोर टोळक्यांकडुन शहरात सुरु आहे.
विद्यार्थिनी रस्त्यावरून पायी चालत असतांना रोडरोमियो मोटारसायकलने मागून येऊन मोठ्या आवाजात गाडीचा हॉर्न वाजविने, रस्त्यावरून वेगात असलेल्या मोटारसायकलवरून मुलींना कट मारून जाने, आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत असल्याने ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी ही रोमियोगिरीची घुसमट नाईलाजाने सहन करावी लागते आहे.
रोमियो गिरी करणारे तरुण अगदी चौदा ते वीस वयोगटातील असून ‘हिरोगिरी’ करण्याच्या नादात आपण काहीतरी गुन्हा करतोय याची जाणीव त्यांना नसल्याचे दिसून येते.अशाप्रकारच्या कृत्यांवर वेळीच प्रतिबंद घातला जात नसल्याने त्यांचे धाडस वाढत असून प्रसंगी विनयभंगा सारखा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असले प्रकार वाढु नये यासाठी पालकांनी वेळीच आपल्या मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देण्याची गरज असुन पोलिसांनी रितसर तक्रार येण्याची वाट न पाहता स्वत: लक्ष घालुन या टवाळखोर टोळक्यांना ‘वेसन’ घालने गरजेचे होऊन बसले आहे.




