– नवरगावात उसळला जनसागर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
उसळलेला जनसागर..लक्ष लक्ष नयनांतून ओघळणारे अश्रू…आणि रमेश भाऊ-रमेश भाऊ अशी आर्त हाक…अशा जड अंतकरणाने मारेगाव तालुक्यात मनसेची बिजे रोवणारे खंबीर नेतृत्व मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रमेशभाऊ सोनुले यांना २४ जुलै रोजी नवरगाव येथील स्मशानभूमीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
गत १४ वर्षापासून मारेगाव तालुक्यात मनसेचे इंजिन एक हाती सांभाळणारे नेतृत्व काल काळाच्या पडद्याआड गेले.आपल्या काळात पक्ष वाढीसाठी अवघा तालुका पालथे घालणारे, तालुक्यात मनसेचे बीज रोवण्यापासून ते त्या बीजापासून मनसेचा वटवृक्ष तयार करणारे रमेश भाऊ आज आपणात नाही ही गोष्ट पचवणे अवघडच.
गत दोन वर्षापासून रमेश भाऊंना रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले होते.परिणामी काल दुपारी ३:३० वाजे दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.आज दुपारी शेकडोंच्या उपस्थितीत रमेश भाऊंना नवरगाव येथील स्मशानभूमीत ओल्याचींब नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.यावेळी अवघी पंचक्रोशी हळहळली.
रमेश भाऊंचा परिचय दांडगा व स्वभाव मनमिळाऊ असल्याने यावेळी राजकीय वर्तुळातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील हजारो नागरिकांसह नवरगावातील जनसागर उपस्थित होता.





