– राज्य महामार्गावर तयार झालेय ‘स्लोप’
– प्रवाशांच्या जीवाशी खेळ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आयव्हीआरसीएल कंपनी मार्फत दोन महिन्या आधी करण्यात आले होते.खड्डे बुजले असले तरी खड्ड्यांच्या जागी महामार्गावर स्लोप तयार झाले असल्याने वाहन घसरुन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.थातूरमातूर काम उरकून कंपनीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून एखादा नाहक बळी गेल्यानंतरच कंपनीला जाग येणार काय…? अशी तिखट प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत असून आयव्हीआरसीएल कंपनी विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
वणी-यवतमाळ महामार्ग हा सतत ओव्हरलोड वाहतुकीचा मार्ग आहे.कंपनीचा कामचुकारपणा की सतत होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा परिणाम हे निश्चित सांगता येत नसले तरी महामार्ग तयार झाल्यावर काही काळातच राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते.याचा नाहक त्रास वाहन चालकांना तसेच पादचऱ्यांना होत होता.
महामार्गावर छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असताना २८ डिसेंबर रोजी एका युवकास आपला जीव गमवावा लागला होता.सदर घटनेनंतर महामार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे या करिता पीडब्ल्यूडी विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने पीडब्ल्यूडी विभागाने आयव्हीआरसीएल कंपनीला महामार्गावरील खड्ड्यांबाबत कळवून खड्डे त्वरित बुजविण्यात यावे असे सुचवल्यानंतर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास नेत सदर महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते.
तूर्तास खड्डे बुजले असले तरी आयव्हीआरसीएल कंपनीचे बींग मात्र उघडे पडले आहे. अगदीच नगण्य अशा कालावधीत शहराच्या मधोमध राज्य महामार्गावर ‘स्लोप’ तयार झाले असून यामुळे अपघाताची शक्यता ही नेहमीच बळावलेली असते. कंपनी विरोधात नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त केला जात असून प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवुन सदर प्रश्न त्वरित मार्गी लावावा असा सूर जनताजनार्दनातून उमटत आहे.

हायमास्ट बनले शोभेची वास्तू….
राज्य महामार्गावर गौराळा व करणवाडी येथे ओव्हरलोड वाहनांच्या पार्किंग करिता महामार्गाच्या बाजूलाच साईड वे तयार करण्यात आला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात.या ठिकाणी दोनही बाजूला गगनचुंबी हायमास्ट दिवे लावलेले आहेत.परंतु यातील करणवाडी येथील एका बाजुचा एकच हायमास्ट काजव्यागत लुकलुकत असून गौराळा फाट्यावरील हायमास्ट खाली नेहमीच किर्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.





