– मारेगाव – मार्डी रस्त्यावरुन पुढील दहा दिवस आवागमन
– जनहित कल्याण संघटनेचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव-मार्डी मार्गावरून शालेय विद्यार्थ्यांकरिता बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा तसेच शिकवणी करिता मारेगावात येण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागतो. याच अवैध प्रवासी वाहतुकीने नुकताच अनिकेतचा बळी घेतला. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात या घटनेने प्रचंड धास्ती भरली असतानाच जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी पुढाकार घेत पुढील दहा दिवस दिवाळी सुट्ट्यांपर्यंत मोफत शालेय विद्यार्थ्यांकरिता मारेगाव-मार्डी मार्गावरून बस उपलब्ध करून दिली.
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथून दहा ते बारा शालेय विद्यार्थी घेऊन येणारा ऑटो पिसगाव येथील पांढरकवडा (ल) फाट्याजवळ पलटी होऊन केगाव येथील अनिकेत नामक विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला होता.ठिकठिकाणी झिंगलेला रस्ता, अवैध प्रवासी वाहतूक व परिवहन मंडळाची अनास्था यामुळेच अनिकेतला आपला जीव गमावावा लागला.या घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले होते. सदर घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली होती.
दरम्यान जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांनी मार्डी परिसरातून मारेगावात शिक्षणाकरिता येणाऱ्या कुटुंबियांची भेट घेतली.यावेळी भीतीग्रस्त चिमुकल्यांच्या मनातील चलबिचल त्यांनी क्षणात ओळखली.परिणामी ३० ऑक्टोंबर रोजी पासून पुढील दहा दिवस दिवाळी सुट्ट्या पर्यंत मोफत खाजगी बस देण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला.अन् क्षणात चिमुकल्यांच्या चेहरे चमकले. यावेळी वणी आगर प्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थिनी प्रमाणेच विद्यार्थ्यांनाही दिवाळी सुट्ट्यानंतर शालेय बस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले.
२७ ऑक्टोबर रोजी घडलेली दुःखद घटना पुनश्च घडू नये म्हणून जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, अध्यक्ष समीर कुडमेथे , उपाध्यक्ष रॉयल सय्यद ,सचिव निलेश तेलंग यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असुन याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




