– नरसाळा येथील युवकाच्या जिद्दीला सलाम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
– संपादकीय लेख…
प्रफुल्ल ठाकरे….
प्रत्येकाच्या जीवनात संकटं येतात. जीवन व संकट या एकाच दोरीच्या दोन गाठी.येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत पुढे जातो तो खरा हिरो… असाच एक हिरो तालुक्यातील नरसाळा येथे बहरतोय.एका डोळ्याने अपंग असूनही प्रत्येक संकटाला तोंड देत सामोर जातोय.त्याचं नाव आहे सुरज मांडवकर.
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट.. कष्ट..आणि कष्ट…या ओळी सुरजला तंतोतंत जुळतात.
तालुक्यातील नरसाळा हे ५००-६०० लोकसंख्या असलेल गावं. सुरजचा जन्म इथेच झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यात डोळ्याने अपंग. प्राथमिक शिक्षण नरसाळा येथे झालेला सुरज पुढील शिक्षणासाठी मारेगाव येथे आला. परंतु म्हणतात ना परिस्थिती भल्याभल्यांना शिकवते. असेच काहीसे सुरजच्या बाबतीत घडले.
सुरजसह एक भाऊ , पत्नी यांचा पाच एकर शेतीत सुरजचे वडील उदरनिर्वाह करत होते.पण शेती कायम तोट्यात त्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असल्याने सुरज आपले शिक्षण पूर्ण करू शकला नाही.
बी.ए.प्रथम वर्षाला असताना शिक्षण अर्धवट सोडून घराचा गाडा हाकण्याची जबाबदारी सुरज वर येऊन पडली आणि येथूनच त्याच्या फिनिक्स भरारी ची सुरुवात झाली.
एकच डोळा असलेल्या सुरजला नोकरी कोण देणार…? पण पठ्ठ्यात जिद्द होती.काहीतरी वेगळं करण्याची.पण मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते.
डोळ्याने अपंग असल्याने काही शासन मदत मिळेल याकरिता सुरज ने वारंवार यवतमाळ येथील कार्यालयात पाय झिजविले. परंतु पदरी आली ती निराशाच….!
५००-६०० लोकसंख्या असलेल्या गावात नेमका कोणता व्यवसाय थाटायचा…? थाटला तर तो चालेल का…? हा प्रश्न कायम मनात असताना त्याने हेअर सलूनचा व्यवसाय सुरू केला. काही दिवस कठीण गेले.ग्राहक मिळेना.पण भावाच्या हातात जादू अन् डोक्यात जिद्द कायम होतीच.
सुरजच्या मन मिळावू स्वभावाने व हातातील कलेने अवघ्या काही काळातच सुरजच्या दुकानावर ग्राहकांची झुंबड दिसू लागली. आज मारेगाव , वडकी , पांढरकवडा येथील ग्राहक सुरजच्या हेअर सलूनच्या दुकानावर न चुकता गर्दी करतात.
१०० टक्के एका डोळ्याचे अपंगत्व असुनही ३० वर्षीय सूरजने घेतलेली ही फिनिक्स भरारी भल्याभल्यांना भुरळ घालणारी आहे. वाईट दिवस गेले , परिस्थिती सुधारली. सुरजचा स्वभाव मात्र जो होता तोच आहे. सुरजने हे यश केवळ जिद्दीच्या बळावर मिळवले असून खरंच त्याच्या जिद्दीला सलाम.
