– शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत असुन विम्याच्या रकमेचा वेळीच भरणा करुनही ‘पिकविम्याची’ रक्कम मात्र तुटपुंजी मिळाल्याने तालुक्यातील दापोरा,चिंचमंडळ, धानोरा उजाड,कोसारा येथील शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी मारेगाव तहसील कार्यालयात धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातुन साकडे घातले.
२०२२ मधील जुलै महिन्यात वर्धा नदीला आलेल्या महापुराने तालुक्यातील दापोरा,कोसारा,चिंचमंडळ, धानोरा उजाड येथील शेतजमीनी चार ते पाच दिवस पाण्याखाली असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते.
शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम वेळेवर धरणा करून पीकविमा पुरबुडीत क्षेत्राच्या मानाने अगदीच तुटपुंजा मिळाला. पुरबुडीत क्षेत्राची पाहणी स्वतः अजित पवार यांनी करून ‘योग्य मदत केली जाईल’ असे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना दिले होते. पिकविमा कंपनीने पंचनामे सुद्धा केले होते. परंतु पिक विमा कंपनीकडून वारंवार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली.
पिक विम्याची रक्कम १०० टक्के मिळायला पाहीजे असताना ती अगदीच अत्यल्प मिळाल्याने अखेर १७ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पीक विम्याची शंभर टक्के रक्कम त्यांच्या खात्यात त्वरित वळती करण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अविनाश लांबट, सरपंच रामचंद्र जवादे, किशोर मानकर, वीणा जवादे, आशा किनाके यांचे सह शेकडो सदस्य उपस्थित होते.




