– ता.५/६/२०२३ ची ग्रामसभा खोटी दाखवून,घेतला खोटा ठराव
– गोंड बुरांडा येथील आदिवासी बांधवांचे आमरण उपोषण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
ग्रामपंचायत गोंड बुरांडा येथे ता.५/६/२०२३ रोजीची घेण्यात आलेली ग्रामसभा खोटी असुन, खोटा ठराव घेवुन पेसा ग्रामपंचायत गोंडबुरांडा येथे गैरआदिवासी आशा सेविकेची निवड ही अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत गोंड बुरांडा येथील नागरिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून ता. १५ ऑक्टोबर पासुन पंचायत समिती समोर उपोषणास सुरुवात करण्यात आली.
ता.१५ ऑक्टोबर रोजी एकीककडे दुर्गोत्सवाला सुरवात झाली असुन तालुक्यात शहरासह गाव पाड्यांवर मोठ्या उत्साहात लहान थोर आनंदात असतांना मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे अन्याया विरोधात गोंड बुरांडा येथील नागरिकांनी हक्कासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
मारेगांव तालुका हा आदिवासीबहुल असुन ५६ ग्रामपंचायती गावकारभार सांभाळतात यातील जवळपास अर्ध्या ग्रामपंचायत ह्या पेसामध्ये आहे. त्यातील गोंड बुरांडा ही ग्रामपंचायत सुध्दा पेसा मध्ये असुन आशा सेविकेच्या निवडीवरुन उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागल्याचे दिसत आहे.
पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे तिथे प्रथम प्राधान्य आदिवासी व्यक्तीला द्यायला पाहीजे असतांना गैर आदिवासीला का ?? असा सवाल करत, पेसा कायद्याला बगल देण्याचे काम येथील संबंधीत ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती, प्रशासन करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पेसा कायदा हा आदिवासी लोकांचा स्वयंशासनाचा सर्वोच्च कायदा असून देखील पेसा कायद्याला बगल देण्याचे काम करण्यात आले आहे.
दरम्यान या संदर्भात पंचायत समितीला वारंवार मौखिक व लेखी स्वरुपात देवून सुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ यांचेकडे जावुन संबंधीत प्रकरणाचे निवेदन दिले व स्वतः त्यांचे सोबत चर्चा करण्यात आल्याचे नमुद करत १५ तारखेपर्यंत आदिवासी जनतेला न्याय मिळाला नसल्याने लोकशाही पध्दतीने ता.१५ ऑक्टोबर पासुन पंचायत समिती मारेगांव कार्यालयासमोर उपोषण करत असल्याचे सुध्दा निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




