– भाविकांचे डोळे पानावले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मंगळवारी ता.१९ सप्टेंबर रोजी ढोल ताशांच्या गजरात, वाजत-गाजत आपल्या घरी गणरायांचे आगमन झाले होते.त्यानंतर आता रविवारी पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचा भक्तांनी निरोप घेतला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’ या घोषणांच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाचा निरोप घेतला.आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांचे डोळे कमालीचे पाणावले होते.
विघ्नहर्ता गणरायाचे घरी आगमन म्हणजेच दिवाळी पूर्वीची दिवाळी.सकल जनांचे कल्याण करणाऱ्या श्री गणरायांच्या आगमनामुळे घरासह परिसरात नवचैतन्य संचारते.गणरायांच्या आगमनाने अवघा परिसर आनंदमय होऊन जातो.
याही वर्षी १९ सप्टेंबर रोज मंगळवारला शहरासह तालुक्यातील घराघरात गणरायांचे वाजत गाजत आगमन झाले होते. कुठे दीड दिवसीय,कुठे पाच दिवसीय तर कुठे दहा दिवसीय बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

दरम्यान काल ता. २४ सप्टेंबर रोजी पाच दिवसीय बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला.गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…असे म्हणत गणेश भक्तांनी बाप्पाला आर्जव घातल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

आपल्या घरी आलेल्या बाप्पाला कुणी गाडीमध्ये बसवून तर कुणी डोक्यावर घेऊन विसर्जन स्थळावर नेले.त्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे आरती करण्यात आली.यावेळी गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी कुणी बाप्पासोबत फोटो काढले तर कुणी सेल्फी घेताना पहायला मिळाले.त्यानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला तो…पुढच्या वर्षी लवकर या…या अपेक्षेने…!




