– ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अवघ्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.ता. २३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुंभा येथे ‘माझी माती माझा देश’ अभियाना अंतर्गत ‘अमृत कलश दिंडीचे’ आयोजन ग्रामपंचायत कुंभा द्वारा करण्यात आले होते.यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहे. याची प्रचिती २३ सप्टेंबर रोजी मारेगाव तालुक्यातील कुंभा येथेही आली.
येथील ग्रामपंचायतद्वारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘माझी माती माझा देश’ अभियाना अंतर्गत ‘अमृत कलश दिंडीचे’ आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्थानिक शेतकऱ्यांकडून कलशामध्ये माती व भूमिहीन कुटुंबाकडून चिमुटभर तांदूळ घेत आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. यात गावातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हा परिषद शाळा कुंभा व भारत विद्या मंदिर कुंभा येथील विद्यार्थ्यांनी मनमोहक वेशभूषा करून ‘अमृत कलश दिंडीत’ सहभाग नोंदविला. या अमृत कलश दिंडीत परिसरातील आशा वर्करने ही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

यावेळी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच गजानन ठाकरे, ग्रामविकास अधिकारी विजय ऊईके, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.




