– दुपारचे ऊन करतेय अंगाची लाही लाही
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मे महिन्यात अवकाळीच्या सरी अधूनमधून कोसळत असतानाच ‘मे हिट’ची अनुभूती मारेगावकर घेत आहेत.महीना भरापासून अवकाळीने शांत ठेवलेल्या सुर्यदेवांचा प्रकोप गेल्या काही दिवसात चांगलाच वाढला असून दुपारचे ऊन अंगाची लाही लाही करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढताच राहिला असून शुक्रवारी दुपारी एक वाजता तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने वातावरणात उष्म्याची काहिली वाढल्याचे जाणवत होते. तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. त्यामुळे आपसूकच विजेचा वापर वाढला आहे.
उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली असते.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ व गॉगल विक्रीलादेखील प्रतिसाद मिळत असून महिला-तरुणी सर्वांग झाकून तोंडाला स्कार्फ लावून मार्गक्रमण करीत असल्याचे चित्र दिसत आहे.




