– एका बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाचा कारवाईचा ‘डोज’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांनी कमालीचा उच्छाद मांडला आहे.सदर बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची लूटमार सुरू असून अव्वाच्या सव्वा फी आकारून रुग्णांवर वेळ चलाऊ उपचार सुरू असुन रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.परिणामी मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी यांनी ता. ११ ऑक्टोबर रोजी कारवाईचा सपाटा लावत शहरातील एका बोगस डॉक्टरवर कारवाई केली.या धडाकेबाज कारवाईने ‘मुन्नाभाईंत’ कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाली आहे.
मारेगाव शहरासह तालुक्यात बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे.या बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर वेळ चलाऊ उपचार सुरू आहे. कुठलीही डॉक्टरकीची पदविका नसताना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याने रुग्णांच्या आरोग्यास प्रचंड धोका निर्माण झाला आहे.
गत काही दिवसाआधी नेमका हाच मुद्दा मनसेने उचलून धरत या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते.परिणामी तालुका आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर येत मारेगावात एका बोगस डॉक्टरवर कारवाई करून याचे संकेत दिले.
ता.११ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे यांनी मारेगावातील बंगाली डॉक्टर नित्यानंद दास (४०) यांचे रुग्णालयाची तपासणी केली असता दास यांचेकडे ऍलोपॅथिक औषधाचा साठा आढळून आला.याबाबत दास यांना विचारणा केली असता त्यांनी चुप्पी साधल्याने दास यांचे विरोधात मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असुन औषधांचा साठा पोलीसांच्या सुपुर्द करण्यात आला आहे.
मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे यांचे धडाकेबाज कारवाईने गत काही वर्षापासून शहरासह तालुक्यात अधिराज्य गाजविणाऱ्या बोगस डॉक्टरांत प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




