– मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करा
– अ.भा.आ.वि.परिषदेचे निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मणिपूर येथील कांगपोकपी जिल्ह्यात दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या अमानवीय घटनेने अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळत असतानाच २४ जुलै अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत ‘त्या’ अमानवीय घटनेतील नराधमांना फासावर चढवा तसेच मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली.
मणिपूर येथील कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढुन महिलांना रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.४ मे रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ तब्बल ७७ दिवसांनंतर १९ जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल होताच ‘त्या’ मानव रुपी जनावराविरुद्ध अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.पोलिसांनी त्या घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली असली तरी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अमानवीय घटनेचे पडसाद अवघ्या देशभर उमटतानाचे चित्र सर्वदुर दिसून येत आहे.
दरम्यान २४ जुलै रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (शाखा मारेगाव) तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत मणिपूर येथे होत असलेला आदिवासींचा छळ थांबविण्यात भाजपा सरकार असमर्थ असल्याने तेथे राष्ट्रपती लागू राजवट लागू करण्यात यावी तसेच ‘त्या’ अमानविय घटनेतील नराधमांना त्वरित फासावर चढवण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मारेगाव तालुकाध्यक्ष सुमित गेडाम यांचेसह कार्याध्यक्ष भैय्या कनाके, उपाध्यक्ष राजू सिडाम, सचिव शंकर मडावी, निलेश आत्राम, दिगांबर आत्राम, सुखदेव आत्राम,गितेश तामगडगे रामदास मेश्राम, तुळशीराम गेडाम, रुपेश दुर्वे आदी उपस्थित होते.




