♦शेकडो बघ्यांच्या गर्दीत “मनस्विचे चित्तथरारक प्रात्यक्षिक”
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
स्केटिंग मध्ये जागतिक विक्रमाला गवसणी घालणाऱ्या इवल्याशा पाच वर्षीय “मनस्वीने”आठ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मारेगाव येथील पोलिस स्टेशन ते आंबेडकर चौक रस्त्यावर “लिंबो फायर बार स्केटिंग” चे अंगावर शहारे आणणारे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करून मारेगावकरांना भुरळ घातली.
अवघ्या पाच वर्षांची “मनस्वी” ही मुळची मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील विशाल पिंपरे व स्नेहल पिंपरे यांची मुलगी.”मुर्ती लहान पण कीर्ती महान” असलेल्या मनस्विने नुकताच स्केटिंग मध्ये जागतिक विश्व विक्रम आपल्या नावे केला आहे.

मनस्विने “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” सहीत १६ वेगवेगळ्या बुक्स मध्ये रेकॉर्ड नोंदविलेले आहेत.मनस्वी कडे सद्यस्थितीत वैश्विक स्तरावरील स्पर्धांमध्ये गवसणी घातलेले ६० गोल्ड मेडल असून सात सिल्व्हर आणि आठ ब्रांझ मेडल आहेत.मनस्वी ही पन्नास मीटर लांब लिंबो फायर स्केटिंग करणारी पाच वर्षाची जगातील पहिली मुलगी आहे.अवघ्या अठरा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत मनस्वीने यशाची उत्तुंग भरारी घेतली हे विशेष.
याच विक्रमवीर सुवर्ण कन्येचे आज मारेगाव येथील “लिंबो फायर बार स्केटिंग”प्रकारातील अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक पाहून मारेगाव वासियांनी चक्क तोंडात बोटे घालून “मनस्वी चे मनःपूर्वक”कौतुक केले.अवघ्या पाच वर्षाच्या “मनस्वी”ने केलेल्या स्केटिंगच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी शहरवासीयांना चांगलीच भुरळ घातली.

