लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
विज्ञान व यंत्र युगात शिक्षणाचा प्रसार व शिक्षित, उच्च शिक्षित होणे आवश्यक आहे. परंतु ज्यांच्या कडे शेती पर्याय असताना सुध्दा ते शेती करण्यास धजावत नसल्याने शेतातील श्रमाच्या कामासाठी युवा पिढी तयार नसल्याने शेतीच्या कामाला मजुर मिळणे कठीण झाले आहे. परिणामी शेती कामाला मजुर मिळत नसल्याने शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला आहे.
आज शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला असुन दुसरीकडे मजुरांच्या तुटवड्यामुळे शेती व्यवसाय बंद करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. शेतातील मेहनतीचे कामे करायला शिक्षण घेतल्यामुळे आजची युवा पिढी तयार नाही. तालुक्यातील दहावी,बारावी तर काही पदवीधर, रोजगारासाठी मोठ्या शहाराकडे धाव घेत आहे. उन्ह पावसातील कष्टाची कामे झुगारून शहरात काम करणे पसंत करीत आहे.
तर गावात शिल्लक असलेले काही मजुर काम करताना दिसत आहे. त्यामुळे शेतीचे कामे करताना शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहे. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी बाहेरुन मजुर आणतात, तर काही शेतकरी यांत्रिकरणाकडे वळले आहे.आता शेतीचे बहुतांश कामे यंत्रानी केल्या जात आहे.
गेल्या दशका पर्यंत शेतमजुरांचे दर आवाक्यात होते.परंतु या दशकात सालदाराने दीड लाखाचा आकडा ओलांडला आहे. पुरुष रोजदार ४०० रुपयांचे वर तर महिला रोजदार २५०-३०० रुपयाचे वर पोहचले आहेत. त्यात येवढे पैसे देऊनही मजुर काही तास काम करतात.
परिणामी शेतकऱ्यांना दुसरा पर्याय उरला नसल्यामुळे व शेती करणे आवश्यक असल्याने, शेतकरी यंत्राच्या सहाय्याने शेती करण्यास सरसावला असल्याचे सर्वदुर चित्र आहे.





