– आर्णी तालुक्यातील घटनेचे राज्यभर पडसाद
– भूमापकास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
कर्तव्यावर असलेल्या कोतवाल कर्मचाऱ्यास भुमापकाने अश्लील शब्दात शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना १९ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता आर्णी येथे घडली.सदर घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून ‘त्या’ भूमापकस शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राज्य कोतवाल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले असुन विविध संघटनांनी यास पाठिंबा दर्शविला आहे.
आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथील कोतवाल ए.पी.दरोड यांची ड्युटी पूर नियंत्रण कक्षात लागलेली असताना ते १९ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता कर्तव्यावर हजर झाले.दरम्यान त्यांचे सोबतच ड्युटी असलेले भूमापक एस.जी.चव्हाण रात्री १०:३० वाजता कर्तव्यावर हजर झाले.यावेळी एस.जी.चव्हाण यांनी दरोड यांना अभद्र अश्लील शब्दात शिवीगाळ करून लाथा-बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी दरोड यांनी चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता ‘कोणताही वरिष्ठ अधिकारी माझे काहीही करू शकत नाही तु माझ्या नादी लागू नकोस तुला मी पाहून घेईल; पुढील तीन महिने तुला माझ्यासोबत काम करावयाचे आहे’ अशी धमकी दिली.
या संतापजनक घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून भूमापक एस.जी. चव्हाण यांचेवर कारवाई करुन शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास कामावर बहिष्कार टाकून उपोषणास बसू असा गर्भित इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला असुन विविध संघटनांनी यास पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी राज्य कोतवाल संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत निमसटकर,महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा मुख्य मार्गदर्शक, विभागीय महिला अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, आर्णी तालुका अध्यक्ष आणि कोतवाल संघटना, सर्व तालुका पदाधिकारी व यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य कोतवाल उपस्थित होते.





