– आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करा
– मृतकाच्या पत्नीचा आक्रमक पवित्रा
– ठाणेदारांच्या आश्वासनाअंती मृतदेहाची गावाकडे रवानगी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी केशव नागरी पतसंस्थेच्या तीन अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या पतीने आत्महत्या केली.आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादी अंती मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांना अटक करा;अन्यथा मृतदेह रुग्णालयातून हलविणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतक लक्ष्मण यांच्या पत्नीने घेतल्याने लक्ष्मण यांचा मृतदेह बराच वेळ ग्रामीण रुग्णालयात होता.अखेर ठाणेदारांच्या आश्वासनाअंती मृतदेहाची रवानगी गावाकडे करण्यात आली.
व्यवसायाने बँक व्यवस्थापक असलेले तालुक्यातील करणवाडी येथील लक्ष्मण रामचंद्र शिदुरकर यांनी १९ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान करणवाडी येथीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असतानाच त्यांचे करणवाडी येथील राहते घरी सुसाईड नोट आढळून आली होती.या सुसाईड नोट मधून अखेर लक्ष्मण यांनी आत्महत्या का केली…? हे कोडे उलगडले आहे.
वणी केशव नागरी पतसंस्थेत व्यवस्थापक पदावर असताना लक्ष्मण यांचे संस्थेकडून लिपिक पदावर डिमोशन करण्यात आले होते.यामुळे ते कमालीचे अस्वस्थ झाले होते.यातच पतसंस्थेने त्यांची आर्णी येथे बदली केल्याने लक्ष्मण यांनी पतसंस्थेला स्वतःच्या वडिलांच्या तब्येतीचा दाखला देत बदली न करण्याची वारंवार विनवणी केली होती.
परंतु पतसंस्थेकडून यासाठी तब्बल ७ लाख रुपयांची मागणी केली गेली.सोबतच लक्ष्मण यांच्या मोबाईल मधील सर्व डाटा पतसंस्थेने डिलीट केल्याची बाब मृतकाच्या पत्नीने मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
तूर्तास पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेचे शाखा अध्यक्ष चंद्रशेखर खोंड सह सचिव अनिल आक्केवार,कार्यकारी अधिकारी दीपक दीकुंडवार तिघेही रा.वणी यांचेवर संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम ३०६ ,३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मृतदेह बराच वेळ ग्रामीण रुग्णालयात…!
मृतक लक्ष्मण यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून केशव नागरी पतसंस्थेच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.परंतु जोपर्यंत ‘त्या’ तिघांनाही अटक करणार नाही ; तोपर्यंत लक्ष्मण यांचा मृतदेह रुग्णालयातून हलविणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मृतक लक्ष्मण यांच्या पत्नी रूपाली शिदुरकर यांनी घेतला होता.यावेळी रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांसह बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती.

मारेगाव ठाणेदार यांचे आश्वासन…!
संशयित आरोपींवर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत.आरोपींचे लोकेशन ट्रॅक करण्याचे प्रयत्न सर्वतोपरी सुरू असून आरोपींच्या लोकेशनचा छडा लागताच आम्ही आरोपींना अटक करू.
ठाणेदार – जनार्दन खंडेराव.




