– आठवडी बाजारात प्रचंड चिखलाचे साम्राज्य
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील आठवडी बाजाराला विविध समस्यांनी ग्रासले असून प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे निदर्शनास येत आहे.परिणामी पहिल्याच पावसात आठवडी बाजारात प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
तालुक्यातील १०८ गावांकरिता सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे मारेगाव.तालुक्यात रोज-मजुरी करून जगणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने येथील आठवडी बाजारात दर मंगळवारी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळते.
परंतु पहिल्याच पावसात येथील आठवडी बाजारात प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. आठवडी बाजाराच्या खरेदी करता उसळलेल्या नागरिकांच्या गर्दीला नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने प्रशासनाविरुद्ध चीड निर्माण झाली आहे.

शहरातील आठवडी बाजारात वाहनांच्या पार्किंग करिता वेगळी अशी जागा उपलब्ध नाही, बाजारात मोकाट जनावरांनी पुरता हैदोस माजविला आहे.त्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य अशा शेकडो समस्यांनी आठवडी बाजाराला ग्रासले असून ‘आठवडी बाजारातील समस्यांवर प्रशासनाला उपाय सापडेना’ असे म्हणावयाची वेळ जनसामान्यांवर येऊन पडली आहे.




