– बस थांब्याच्या जागेत बदल निव्वळ ‘थोतांडबाजी’
– प्रवाशांत संतापाची लाट
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गत ऑगस्ट महिन्यात बस स्थानक निर्मितीच्या हालचालींना मारेगावात कमालीचा वेग आल्याचे ‘गोड स्वप्न’ प्रशासनाने मारेगावकरांना दाखवले.बस थांब्याच्या जागेत बदल झाल्याने तीन दशकापासून रेंगाळत असलेला बस स्थानकाचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे दिसु लागली होती.परंतु बस थांब्याच्या जागेत बदल होऊन तब्बल दीड महिना उलटला असला तरी नियोजित जागी आवश्यक सुविधांअभावी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडुन प्रवाशांची सर्रास थट्टा सुरू आहे.परिणामी जनसामान्यांकडून अघोषित आंदोलनाचा ‘गंध’ पसरू लागला आहे.
मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने चहूबाजूच्या ग्रामीण भागातून शहरात नागरिकांची आवक असते.यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी,सर्व वयोगटातील प्रवासी तसेच कार्यालयीन कर्मचारी यांची संख्या मोठी आहे.
वणी आगार प्रमुख व विद्यमान आमदारांनी ऑगस्ट महिन्यात सूचनारुपी आदेश काढून वणी-मारेगाव- यवतमाळ महामार्गावरुन धावणाऱ्या परिवहन मंडळाच्या चालक व वाहकांनी बस स्थानकाच्या नियोजित जागीच बस थांबवाव्यात असा आदेश दिला होता. सदर आदेशाने तब्बल तीस वर्षापासून ‘पेंडिंग’ असलेला बस स्थानकाचा प्रश्न आता निकाली निघणार अशी चर्चा जनमानसात सुरू झाली होती.
परंतु तब्बल दीड महिना उलटूनही बस स्थानकाच्या नियोजित जागी ‘बी अँड सी कॉर्टर’ येथे आवश्यक सुविधांचा अभाव दिसून येत आहे.धड बसायलाही जागा नसल्याने नागरिक, विद्यार्थी व प्रवासी रस्त्यावरच ऊन्ह पावसाच्या सरी झेलत ताटकळत उभे राहत आहेत. प्रवासी निवारा व प्रसाधनगृह नसल्याने प्रवाशांची पुरती गैरसोय होत आहे.

परिणामी बस थांब्याच्या जागेत बदल करणे ही सर्वसामान्यांसाठी निव्वळ ‘थोतांडबाजी’ व ‘डोकेदुखी’ ठरू पाहत आहे. हीच परिस्थिती कायम असल्यास नागरिकांकडून एखादे अघोषित आंदोलन होण्याचा कयास नाकारता येणार नाही.




