– बस स्थानकाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याची मागणी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील १०८ गावांचे ओझे एकहाती वाहणाऱ्या मारेगाव शहरात अनेक गोष्टी केवळ नाममात्र असून शहरास शेकडो समस्यांनी विळखा घातला आहे.यात बसस्थानकाचा प्रश्न रेटुन उभा असून याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे या प्रमुख मागणीसह ८२ वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे यांनी २० सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देत शहरात उभे असलेले प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी केली.
मारेगाव शहरात अनेक समस्या आवासुन उभ्या असुन कोणाही लोकप्रतिनिधी कडुन यास हात घातला जात नाही.दरम्यान शहरातील जेष्ठ समाजसेवक पुंडलिकराव साठे यांनी पुढाकार घेत विविध मागण्या संबंधीचे निवेदन २० सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना सादर केले.
यात नवीन बस थांब्याच्या नियोजित जागी प्रवाशांकरिता प्रसाधनंगृह,बसण्यास शेड उपलब्ध करून द्यावे, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गैरसोय टाळावी, पंचायत समिती क्वार्टरच्या पडक्या इमारतीकडे लक्ष द्यावे, शहरात विजेचा होत असलेला लपंडाव तात्काळ थांबवावा, शहरातील मोकाट जनावरांचा व बेवारस कुत्र्यांचा प्रश्न तात्काळ निकाली लावावा तसेच तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर गतिरोधक लावावे आदी प्रमुख मागण्या ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिकराव साठे यांनी तहसीलदार मारेगाव यांना निवेदनातून केल्या आहे.




