– गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा हे गाव पेसा अंतर्गत येत असून येथील आशा सेविकेची दुसरी जागा रिक्त आहे.या दुसऱ्या जागी करिता उमेदवाराची निवड आदिवासी समाजातुन करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांना दिले.याला बगल दिल्यास गंभीर आंदोलन छेडण्याचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गोंडबुरांना ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येत असल्याने शासकीय जागेवर प्रथम प्राधान्य आदिवासी जमातीतील महिलेस देणे गरजेचे असते.परंतु सदर ग्रामपंचायतने ५.६.२०२३ रोजी खोटी ग्रामसभा दाखवून गैर आदिवासी महिलेची निवड केल्याची माहिती असल्याची बाब सदर निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
तालुक्यातील मौजा मच्छिंद्रा येथे अशाच प्रकारे होतो याची जागा राखीव नव्हती.परंतु तेथील ग्रामपंचायत आदिवासी व पेसा अंतर्गत असल्याने जुनी कोतवालाची जाहिरात बदलून आदिवासी समाजाचा कोतवाल तेथे घेण्यात आला.
परिणामी अशाच प्रकारची प्रक्रिया गोंड बुरांडा येथे राबवून आशा सेविकेची रिक्त असलेली दुसरी जागा आदिवासी समाजातून भरण्यात यावी, असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने आपल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष सुमित गेडाम, गंगाधर लोनसावळे, भैया कनाके, राजेश सिडाम,उषा रामपुरे, शालीनी रामपुरे, रत्नमाला मेश्राम, मंदा टेकाम, सुमित्रा रामपुरे उपस्थित होते.





