— मारेगाव येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्राला परवानगी.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
मागील पाच वर्षां पासून तालुक्यातील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. मात्र मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मागील तीन महीन्याअगोदरच सीसीआय केंद्र सुरु व्हावे यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर, कापूस पणन महासंघ संचालक संजय खाडे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर मारेगांव येथे सीसीआय खरेदी केंद्राला मंजुरात मिळाली आहे.
या वर्षी मात्र कापसाचे हमी भाव ७५२० रुपये असताना खाजगी व्यापारी मात्र सात हजार रुपयांच्या वर कापसाची खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ६०० ते ७०० रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण तयार होऊ नये यासाठी सीसीआय कापूस खरेदी केंद्र मारेगाव तालुक्यात सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने व हीतासाठी कृ.उ.बा.स सभापती गौरीशंकर खुराणा यांनी,खासदार प्रतिभाताई धानोरकर तथा कापूस उत्पादक पणन महासंघ संचालक संजय खाडे यांच्याकडे पाठपुरावा करत रेटून धरली होती.
अखेर गौरीशंकर खुराणा यांच्या प्रयत्नाला यश येत पाच वर्षा नंतर तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ता. १३ डिसेंबर रोजी सीसीआय उपमहा प्रबंधक अकोला यांचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले असुन ता १८ डिसेंबरला कापूस खरेदी कारण्यास केंद्र घेण्यास इच्छुक असणाऱ्या जिनिंग कडून निविदा मागितल्या आहे. तर २० डिसेंबर रोजी निविदा खुल्या करुन त्यानंतर केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
तालुक्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु होणार असल्याने व तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट कमी होणार असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
सीसीआय कापूस केंद्र मारेगाव येथे सुरु व्हावे यासाठी कृ.उ.बा.स संचालक रमण डोये यांनी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तथा माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेत विनंती व पाठपुरावा केला. माजी आमदार बोदकुरवार व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री तथा संबंधित विभागाला भ्रमणध्वनीवरून संपर्क करुन शेतकरी हीतासाठी सीसीआय केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न केले.

मारेगाव येथे सीसीआय कापूस खरेदी सुरु होणार असल्याचे पत्र प्राप्त झाले. मात्र श्रेय लाटण्यासाठी अनेक जण समोर आल्याचे दिसत आहे. मला श्रेय घेण्याचे कारण नाही कारण मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असल्याने, शेतकरी हीतासाठी मला जे जे करण्यायोग्य असेल ते मी या पुढेही करणारच आहो.
ज्यांनी सीसीआय केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेत त्या सर्वांचा आभारी असून त्या सर्वाना धन्यवाद.
गौरीशंकर खुराणा,
सभापती, कृ.उ.बा.स
मारेगाव.




