– एका रात्रीत तब्बल १५ च्या वर घरफोड्या
– ५ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
– फिंगरप्रिंट एक्सपर्ट : श्वान पथकास पाचारण
– चोरट्यांच्या शोधात पोलिसांचे ‘चौफेर पालथे’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अवघे शहर बैल पोळ्याचा आनंद साजरा करुन निद्रिस्त असताना १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री मारेगावात तब्बल १५ च्या वर घरफोड्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.यात चोरट्यांनी ५ लाखांच्या वर ऐवजावर डल्ला मारल्याचा कयास आहे. परिणामी फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वानपथकास पाचारण करण्यात आले असून या अट्टल चोरट्यांची ‘मार्बत’ काढण्याचे कडवे आव्हान ऐन बडगा पर्वावर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
मारेगावात बाहेरगावावरून येऊन येथे स्थायिक झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. पोळा-बडगा व शनिवार-रविवारी या सलग सुट्ट्या असल्याने या कर्मचाऱ्यांनी स्वगावी जाणे पसंत केले.नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी शहरात एकाच रात्री तब्बल १५ च्या घरांवर डल्ला मारला.
घरफोडी झालेल्यांत माधव नगरी येथील राजू डवरे,रमेश बोंडे , हेमराज कळंबे,संजय काकडे , सुंदरलाल आत्राम , देविदास भोयर , प्रभाकर जुमडे , संदीप राजगडे , सुनील भोयर , श्रीमती स्वाती आत्राम यांच्या सह ओम नगरी येथील सुरज चिंचोलकर , कविश्वर चांदेकर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाट फोडले.यातून अनेकांच्या घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे आभूषणे व हजारो रुपयांची रोख रक्कम लांबविली.यात एकट्या अविनाश लांबट यांच्या घरातील चक्क तीन तोळ्याच्या वर पोत व १० हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे.

बडग्याच्या सकाळी रात्रीच्या घरफोडीची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. तूर्तास फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून पोलिसांकडून या अट्टल चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
चोरट्यांच्या शोधात पोलिसांचे चौफेर पालथे…!
रात्रीच्या घरफोडीच्या घटनांनी शहरात कमालीची खळबळ माजली असताना पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.शहरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून काही धागा हाती लागतो काय…? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तुर्तास ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचेसह पो.उ.नि.ज्ञानेश्वर सावंत, रजनिकांत पाटील,अजय वाभीटकर अवघे शहर पालथे घालत असून चोरट्यांचा कसुन शोध सुरू आहे.
परंतु एकाच रात्री घडलेल्या तब्बल १५ च्या वर घरफोडीने मारेगाव शहरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




