– इंग्रजी शाळांचा पगडा अन् उन्हाळी सुट्ट्यांवर पाणी
– शिक्षकांचा झालाय केमिकल लोच्या
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात कमालीचा बदल होत इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पगडा निर्माण झाल्याने मराठी शाळांना उतरती कळा लागल्याचे वास्तव दिसून येत आहे.
तर शाळा टिकवून ठेवण्याकरिता विद्यार्थ्यांची आवश्यकता असल्याने मराठी शाळेतील शिक्षक अहोरात्र विद्यार्थ्यांच्या शोधात वणवण करताना दिसून येत असल्याने त्यांचे उन्हाळी सुट्ट्यांवर मात्र पुरते पाणी फिरले आहे.त्यामुळे शिक्षकांचा प्रचंड केमिकल लोच्या झाला असल्यागत दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या, खासगी शाळा वाढल्यानंतर त्याचा सरकारी शाळांना फटका बसू लागला आहे. अनेक शाळांची गुणवत्ता असूनही केवळ मराठी माध्यमामुळे या शाळांमध्ये प्रवेश कमी होत आहेत.शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या संस्थांच्या अनुदानित, विशेषत मराठी माध्यमाच्या शाळांचीही विद्यार्थीसंख्या झपाटय़ाने घटत आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या टिकवण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षक विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पटसंख्या वाढवण्याचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी शिक्षकांची अहोरात्र वणवण अविरत सुरू आहे.
दरम्यान काही संस्थांनी शिक्षकांना विद्यार्थी शोधायचे प्रती शिक्षक टार्गेट दिल्याचे ऐकिवात असुन ‘हम दो हमारे दो’ च्या लिमिटेड जमान्यात नेमका विद्यार्थी आणायचा कुठून…? या विवंचनेत शिक्षकांची पुरती कोंडी झाली आहे.
पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे…
बदलत्या आधुनिक ‘फाईव जी युगात’ पालकांचा कल मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळला असून मराठी शाळांकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे.आमची शाळा कशी श्रेष्ठ,येथील सोयी सुविधा याबद्दल शिक्षक पालकांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.विद्यार्थ्यांच्या दारी आलेल्या शिक्षकांस पालकांकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली जात असली तरी माळरान पालथे घालून शिक्षक ‘विना टिसी’ रिकाम्या हाताने परत येत असल्याचे वास्तव बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे.




