– शहरातील प्रभाग क्रमांक १० येथील भीषण वास्तव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आज सकाळपासूनच शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली.शहरात संततधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाचा कामचलाऊ कारभार पुनश्च एकदा उघडा पाडला आहे.शहरातील प्रभाग क्रमांक १० येथे नालीच्या पाण्याने चक्क घरात शिरकाव केल्याने येथील नागरिकांत प्रशासनाविरुद्ध कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे.
शहरातील जुनी वस्ती म्हणून प्रभाग क्रमांक १० ची ख्याती आहे.अनेक आजी-माजी राजकारण्यांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्रमांक १० येथील एका नालीचे बांधकाम अनेक वर्षापासून अपूर्ण असल्याने ही नाली वाहून जाणाऱ्या पाण्यास अटकाव करत उभी आहे.
दरम्यान २१ जुलै रोजी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सदर नालीच्या दूषित पाण्याने येथील ३ घरात शिरकाव केला.यात भाऊराव रामाजी नेहारे, प्रभाकर मोगरे व आणखी एका घरात पाणी शिरले.परिणामी तीनही घरातील जीवनावश्यक साहित्य ओले झाल्याने येथील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

प्रशासनाने सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन अपुर्ण नालीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी पीडित नागरिकांनी केली आहे.




