– सोनुले कुटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष स्थापनेपासून राजू उंबरकर यांच्या पाठीशी असणारे खंबीर नेतृत्व मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रमेश केशव सोनुले रा.नवरगाव यांचे २३ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजेदरम्यान सेवाग्राम येथे दुःखद निधन झाले.मृत्यू समयी ते ६२ वर्षाचे होते.
तालुक्यातील मनसेचे खंबीर नेतृत्व असलेले रमेश केशवराव सोनुले हे गेल्या कित्येक दिवसापासून रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यासाठी त्यांचेवर नियमित उपचार सुरू होते.
दरम्यान २३ जुलै रोजी सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना वणी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरात रक्ताची पातळी कमी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ सेवाग्राम येथे हलविण्यात आले असता तेथील रुग्णालयात दुपारी ३:३० वाजेदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत रमेश सोनुले यांचे पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगा,विवाहित मुलगी असा आप्तपरिवार असून त्यांचे अवेळी जग सोडून जाण्याने सोनुले कुटुंबासह त्यांचे मित्र परिवारावर पुरती शोककळा पसरली आहे.
उद्या दुपारी ११:३० वाजता नवरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
