– मनसे मैदानात : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना निवेदन
– आंदोलनाचा इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेली विनापरवाना अवैध कापूस खरेदी कायमस्वरूपी बंद करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका शाखा मनसेचे शहराध्यक्ष चांद बहादे यांचे नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना देण्यात आले. अवैधखेडा कापूस खरेदीस त्वरित लगाम न लावल्यास मनसे स्टाईल आंदोलन करून असा गर्भित इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेला मारेगाव तालुका हा आधीच नैसर्गिक संकटांनी ग्रस्त आहे. कधी अतिवृष्टी तर कधी नापिकी यामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यात कपाशीला दरवर्षी कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा कमालीचा बाजार झाला आहे.
दरम्यान यावर्षीही शेतातून बाहेर पडलेले कपाशी रुपी पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरी येऊन पडू लागले आहे.परिणामी शेतकऱ्यांच्या घरात साठवून ठेवलेल्या कापसावर अवैधखेडा कापूस खरेदीदारांची वक्रदृष्टी पडल्याने गाव खेड्यात अवैध कापूस खरेदीला प्रचंड उत आला आहे.
तालुक्यातील मार्डी ,कुंभा , बोटोनी, नवरगाव,वेगाव वनोजा देवी, शिवनाळा ,पेंढरी ,भालेवाडी सालेभट्टी, नरसाळा, अर्जुनी कोलगाव ,डोरली आदी गाव खेड्यात दररोज अवैधखेडा कापूस खरेदीदारांची झुंबड उडत असून याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून अवैधखेडा कापूस खरेदीदारांवर कारवाई करुन शेतकऱ्यांची सुरू असलेली आर्थिक पिळवणूक थांबवा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन मनसे शहराध्यक्ष चांद बहादे यांचे नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना देण्यात आले.
मनसे शहराध्यक्ष चांद बहादे, आकाश खामनकर ,गजानन चंदनखेडे, जमीर सय्यद,हरीश झाडे,ईशांत दारुंडे आदी उपस्थित होते.




