– नागरिकांचे आरोग्य धोक्यात
– महिना लोटूनही उपाययोजना शून्य
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी येथील विठ्ठलवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून दूषित पाण्यात पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना ता.१० मे रोजी लेखी निवेदन देऊनही प्रश्न निकाली न लागल्याने परिसरातील नागरिकांत प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला जातो आहे.
वणी येथील विठ्ठलवाडी परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून दूषित पाणीपुरवठा होत असून येथील नागरिकांनी १० मे रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे घातले होते.
दरम्यान नगरपरिषदेने केलेल्या पाहणीत त्यावेळी दत्ता अपार्टमेंट व सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथील उघड्या प्लॉट वर सांडपाण्यामध्ये दोन लिकेज मिळाले होते.सदर लिकेज दुरुस्त केल्यानंतर सुद्धा पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असुन पाण्याचा रंगही पिवळसर असुन सदर दूषित पाणी वापरत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे.

पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर क्षणिक थातुर-मातूर काम करून नगर परिषदेने काम फत्ते झाल्याचे सांगितले असले तरी विठ्ठलवाडी परिसरात दूषित पाणीपुरवठा सातत्याने सुरू असल्याने येथील नागरिकांत प्रशासनाविरुद्ध असंतोष उफळला आहे.
दरम्यान प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास आंदोलनाचे हत्यार उपसु असा इशारा विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी प्रदीप खंडाळकर,बाळा वैद्य,बंडु धांडे यांचेसह परिसरातील शेकडो नागरिकांनी दिला आहे.





