♦चक्क दोन तास वाहतूक कोंडी…
♦आमदारांच्या मध्यस्थीने तोडगा…
♦तहसीलदार,पोलीस मोर्चा स्थळी दाखल
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
बस स्थानका अभावी महिलांची व प्रवाशांची होत असलेली कुचंबणा थांबावी,मारेगाव येथे लवकरात लवकर बस स्थानक उभारावे या प्रमुख मागणीसाठी ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षाने’ वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर शहरात ‘दोन तास चक्काजाम’ केला.मोर्चाने रौद्ररूप धारण केल्याने चक्क आमदारांना मारेगाव ची वाट धरत मोर्चा स्थळी दाखल व्हावे लागले.यावेळी तहसीलदार दीपक पुंडे,ठाणेदार राजेश पुरी सह पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.

गेल्या तीन दशकापासून मारेगाव येथील बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित असून लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष बसस्थानकाच्या मागणी संदर्भात आक्रमक झाल्याचे दिसून आले.२१ मार्च रोजी बस स्थानकाच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘दोन तास’ वाहतूक कोंडी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.प्रकरण आवाक्या बाहेर जात असल्याचे लक्षात येताच स्वतः आमदारांना मोर्चा स्थळी येऊन मध्यस्थी करावी लागली.

दरम्यान आक्रमक झालेले कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आमदारांना वेठीस धरत बस स्थानकाच्या जागेवर घेऊन जात बस स्थानकाच्या जागी बस कशी जात नाही…? याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.यावेळी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी,तहसीलदार दीपक पुंडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व असंख्य बघ्यांची गर्दी मोर्चा स्थळी झाली होती.

