– घरकुलाचा पाचवा हप्ता मिळेणा
– लाभार्थ्यांचा मार्डी चौक ते न.प. कार्यालय दरम्यान मूक मार्च
– निवेदनासह आंदोलनाचा गर्भित इशारा
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
वर्ष लोटूनही घरकुलाचा पाचवा हप्ता न मिळाल्याने अखेर मारेगावात घरकुल लाभार्थ्यांचा आक्रोश उफाळून आला. मारेगाव येथील नगरसेवक वैभव पवार यांचे नेतृत्वात शहरातील मार्डी चौक ते नगरपंचायत कार्यालया दरम्यान मूक मार्च करत न.प. कार्यालयात धडक देत लाभार्थ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत घरकुलाचा पाचवा हप्ता सात दिवसाचे आत न मिळाल्यास आंदोलन करू असा गर्भित इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. परंतु वर्ष लोटूनही अजून पावेतो घरकुलाचा पाचवा हप्ता लाभार्थ्यांना मिळाला नाही.वारंवार न.प.कार्यालयात चकरा मारत प्रशासनाला साकडे घातले गेले. जाब विचारला गेला परंतु लाभार्थ्यांना नेहमीच उडवा उडवीची उत्तरे दिली गेल्याने अखेर दहा मार्च रोजी घरकुल लाभार्थी आक्रमक होत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात उभे ठाकले. नगरसेवक वैभव पवार यांचे नेतृत्वात लाभार्थ्यांनी शहरातील मार्डी चौक ते नगरपंचायत कार्यालय दरम्यान अतिशय शांततेत,कुठलाही गोंधळ घालता मूक मार्च करत न.प. कार्यालयात धडक दिली.
लाभार्थ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत सात दिवसाचे आत घरकुलाचा पाचवा हप्ता त्यांच्या खात्यात वळता न केल्यास आंदोलनासह उपोषण करण्यात येईल व त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल असा गंभीर इशाराही सदर निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी नगरसेवक वैभव पवार , सुलोचना अनाके, पुष्पा गुंजेवार, सखुबाई काळसर्पे, प्रकाश गेडाम यांचेसह शेकडो घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

नगरसेवक म्हणून माझ्यावर न.प.विरोधात रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे ही लाजिरवाणी बाब असून लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे स्वप्नवत घर पूर्ण करण्याची हमी मी स्वतः घेत असून त्याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी कार्यालया सह मुंबई येथील म्हाडा कार्यालयापर्यंत करणार…
वैभव पवार,नगरसेवक ,मारेगाव.
