लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे…
निसर्ग मानवाला भरभरून देतो.निसर्ग आपला गुरु असून तो आपल्याला सन्मार्ग दाखवीतो.आज माणूस आपल्याच उपकार कर्त्याच्या जीवावर उठला आहे.मानवाने निसर्गाला विद्रूप करायचा जनु निश्चयच केला असून कधीकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला जणू अवकळाच लागली आहे.पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक असून त्या वृक्षांचे योग्य संगोपन करणे आज काळाची गरज होऊन बसली आहे.

शासनाच्या वतीने दरवर्षी लाखो करोड रुपये खर्चून वृक्ष लागवड केली जाते.परंतु वृक्ष लागवड केल्यानंतर त्या वृक्षांचे संवर्धन करणे कठीण जाते.वृक्ष हा मानवाचा खरा सोबती आहे.तो ऊन,वारा,पाऊस यापासून मानवाचे रक्षण करतो.त्या अनुषंगाने दरवर्षी शासनाकडून शतकोटी वृक्षांची लागवड करण्यात येते.वृक्ष लागवडीवर अब्जो रुपये खर्चून सुद्धा वृक्षांच्या संगोपनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही हे भयान वास्तवच म्हणावे लागेल.

स्वतःच्या स्वार्थापोटी मानवाने जंगलतोड सुरू केली.रोड लगत असलेली असंख्य झाडे सुद्धा “प्रगती” च्या नावावर तोडुन चकचकीत रस्ते बांधण्यात आले.प्रगतीच्या नावावर आपल्या येणाऱ्या भावी पिढीला आपण स्वतः मृत्यूच्या दाढेत नेऊन ठेवत आहोत हे सुद्धा मानव वीसरला.असंख्य वृक्षतोडीमुळे जंगलाचे अन्न चक्र बिघडले.पशु-पक्षांचा हक्काचा निवारा मोडल्याने जंगली प्राणी मानवी वस्तीत दिसायला लागले.

वृक्षांमुळे प्रदूषणास आळा बसत असून वृक्षांची मुळे ही जमिनीत पाणी शोषून घेतात.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी ही संतुलित राहते.विविध वनौषधी,पक्षी तसेच प्राण्यांना निवारा व अन्न तर जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आपनास वृक्षांपासूनच मिळतो.यासोबतच व्रूक्ष लागवडीचे असंख्य फायदे सांगता येतील.

वड,पिंपळ,चिंच,कडुनिंब या झाडांचे आयुष्य शेकडो वर्षाचे असते.म्हणूनच संत तुकारामांनी म्हटलेले “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे अगदी खरे आहे.झाले गेले विसरून आता शतकोटी वृक्षांची लागवड न करता फक्त शंभर वृक्षांची लागवड करून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.यासाठी शासनासोबतच प्रशासनाने,विविध सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी तसेच नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
