– दुचाकी चालक युवक गंभीर जखमी
– नागरिकांच्या सतर्कतेने ट्रॅव्हल्स चालक पोलिसांच्या ताब्यात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील अहफाज जिनिंग नजीक नायरा पेट्रोल पंपा समोर भरधाव ट्रॅव्हल्स ने दुचाकीला मागून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजे दरम्यान घडली. यात दुचाकी चालक युवक गंभीर जखमी झाला.
भुषण ढेंगळे (१९) रा.करणवाडी हा महाविद्यालयीन विद्यार्थी काही कामानिमित्त मारेगांव येथे आला असता काम उरकून करणवाडी येथे परतीच्या प्रवासात असताना राज्य महामार्गावरील अहफाज जिनींग नजीक नायरा पेट्रोल पंपा समोर मागून येणाऱ्या डी एन आर ट्रॅव्हल्स ने (क्र.एम.एच.३४ बी.एच.८२७७) दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात मागून जबर धडक दिली.
यात भुषणच्या डोक्याला मार लागुन तो गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला ट्रॅव्हल्सची धडक बसताच दुचाकी दहा ते पंधरा फूट दूर जाऊन कोसळली.
दुचाकीला धडक देताच ट्रॅव्हल्स चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावरील नागरिकांनी ट्रॅव्हल्सला आडवे होत ट्रॅव्हल्सची वाट अडवून धरल्याने ट्रॅव्हल्स चालक पोलिसांच्या ताब्यात सापडुन ट्रॅव्हल्सला मारेगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले.
रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी भुषण ला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमीला पुढील उपचारार्थ वणी येथे हलविल्याची माहिती असुन घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
