लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
पहापळ (ता. पांढरकवडा) : येथील बाबासाहेब देशमुख विद्यालयाने 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2025–26 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या प्रदर्शनात माध्यमिक आदिवासी गटामधून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांच्या प्रयोगाची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी विद्यालयाचा प्रयोग राज्यपातळीवर निवडला जाणे, ही विद्यालयाच्या विज्ञानविषयक सातत्यपूर्ण गुणवत्तेची पावती आहे.
इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. अंबिका महादेव धुडे व कु. स्वराली रितेश कडू यांनी “सोलर पॉवर टेन्ट” हा अत्यंत नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी प्रयोग सादर केला. हा प्रयोग लडाखसारख्या अतिथंड प्रदेशांसह जगातील इतर थंड भागांमध्ये उपयुक्त ठरू शकतो. ज्या ठिकाणी रात्रीचे तापमान शून्य अंश सेल्शिअसपेक्षा कमी असते, अशा परिस्थितीतही या टेन्टमधील तापमान +10 अंश सेल्शिअसपेक्षा अधिक राखण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
या सोलर पॉवर टेन्ट प्रणालीची महत्त्वाची विशेषता म्हणजे दिवसा साठवलेली उष्ण ऊर्जा रात्री वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी किंवा बॅटरीची आवश्यकता भासत नाही. विद्यार्थिनींनी तंत्रस्नेही मार्गदर्शक शिक्षक निलेश लिखार यांच्या मार्गदर्शनाखाली जेलसारखा उष्णता साठवणारा विशेष पदार्थ विकसित केला आहे. हा पदार्थ दिवसा सूर्यऊर्जेच्या साहाय्याने उष्णता साठवतो व ती साठवलेली उष्णता रात्री टेन्ट उबदार ठेवण्यासाठी वापरली जाते.
या प्रणालीचा सीमेवरील सैनिक, थंड प्रदेशातील नागरिक, पर्यटक, गिर्यारोहक तसेच संशोधक यांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. विद्यार्थ्यांना सतत वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनात्मक प्रवाहात आणण्याची भूमिका येथिल शिक्षक निलेश लिखार सातत्याने पार पाडत असून, त्याचेच हे यशस्वी फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

या यशामध्ये विज्ञान शिक्षिका कु. शिवानी खडसे यांचेही मोलाचे योगदान असून त्यांनी विद्यार्थिनींना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य दिले.
या गौरवशाली यशाबद्दल संस्थेचे सचिव अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्था निरीक्षण समितीचे अध्यक्ष अनिसखान, सदस्य मोरेश्वर सरोदे, शिक्षक सुनिल ठाकरे व शिक्षीका कु. ज्योती अडपावार, शिक्षक हरिदास कापसे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चल्लावार व उपमुख्याध्यापिका कु. ज्योती अडपावार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






