– तापमानाचा पारा ४३ अंशावर
– बचावासाठी प्रयत्न गरजेचे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
एप्रिल महिन्यात अवकाळीने कहर माजविला असला तरी मे महिन्यात मात्र सूर्य आग ओकू लागला आहे. तापमानाचा पारा चक्क ४३ अंशावर गेल्याने अंगाची पूरती लाही-लाही होत आहे.उन्हाची तीव्रता कमालीची वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यापासून पशु-पक्षीही बचावले नसून उष्माघाताचे बळी ठरत आहे.
चिमणी, कावळे ,कुत्री, खार, मांजर, कबूतर आधी असंख्य पशुपक्ष्यांना सावलीच्या आधाराची गरज आहे. या असहनीय उष्माघातापासून मुक्या जीवांचा बचाव करण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
एप्रिल महिन्यात सतत अवकाळीची रिप रीप सुरू असल्याने ऊन्हाची काहीली काहीशी कमी जाणवली.मे महिन्यात मात्र उन्हाचा पारा कमालीचा वाढल्याने उकाडा असह्य होऊ लागला.ऊन्हाच्या तीव्रतेपासून बचाव होण्यासाठी नागरिक थंड पेय, सरबत यांचा आसरा घेताना दिसुन येताय…पण वाढत्या उन्हाने त्या पशु-पक्ष्यांचे काय…? हा प्रश्न मनाला चटका लावून जातो.
सर्व सजीवांच्या जीवन क्रिया एक समान असतात.ऊन्हाळ्यात मानवाला भूक कमी लागते. कधी अपचन तर कधी नाकातून रक्तस्त्राव होतो.ही गोष्ट पशु पक्षांना सुद्धा लागू होते. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पशुपक्षी झाडांचा आसरा घेतात. पण यामुळे ते उष्माघातापासून कायम सुरक्षित राहू शकत नाही.
ज्या पशु पक्षांना उष्म्याचा फटका बसतो अशा पशुपक्ष्यांना तातडीने वैद्यकीय उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. यात पक्षांना उष्म्याचा फटका लवकर बसतो. कारण उंच आकाशात भरारी घेत असताना उन्हाची चटकेही त्यांना तीव्र जाणवतात. उंच भरारी घेताना त्यांना दम लागतो. हिट स्ट्रोक होऊ शकतो.
निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहण्याकरिता आज सर्वांनी एकत्र येऊन पशुपक्ष्यांचे रक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.छतावर मातीच्या भांड्यात पक्षांसाठी पाणी ठेवणे, शक्य असल्यास त्यांचेसाठी सावलीची व्यवस्था करणे,खायला दाणापाणी देणे आदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पशु-पक्ष्यांचे प्राण वाचवू शकतो.





