– मारेगाव तालुक्यातील घटना
– मृत युवकाच्या मित्राचा घटनास्थळावरून पोबारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोनी येथे भरधाव दुचाकी वरून युवक पडुन मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना २८ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजे दरम्यान घडली.
२८ जुन रोजी सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान दोन युवक दुचाकीने (क्र.एम.एच.२६ यु.९५११) करंजी येथे जात होते. दरम्यान वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोनी येथे भरधाव दुचाकी वरून मागे बसलेल्या मित्राचा तोल गेल्याने तो रस्त्यावर कोसळुन मागाहून येणाऱ्या ट्रकच्या (क्र. एम.एच.२१ बि.७७७०) पुढील चाकात आल्याने युवकाचा पुरता चेंदामेंदा झाला.
यावेळी दुचाकीवर स्वार असलेला त्याचा दुसरा मित्र दुचाकीसह मृत युवकाचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.
अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस स्टेशनचे बीट जमादार संकुरवार यांनी अपघात स्थळी भेट देत पंचनामा करुन युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
वृत्त लिहीपर्यंत अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव कळू शकले नव्हते.
