– मारेगाव-मार्डी रस्त्याची अवस्था दयनीय
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव-मार्डी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असताना सदर रस्त्यावरील खड्डे आठ दिवसाआधी बुजविण्यात आले.परंतु अवघ्या आठ दिवसाआधी बुजविलेल्या खड्ड्यांनी पुनश्च एकदा तोंड उघडे केले आहे.परिणामी मारेगाव-मार्डी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेतून याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.आपल्या अखत्यारीत येणाऱ्या शंभरावर गावांचे ओझे एक हाती वाहणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणाची अवस्थाही फारशी कौतुकास्पद नाही.शहराला शेकडो समस्यांनी ग्रासले असताना आता गाव खेड्यातुन शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था ही बिकट झाली आहे.
दरम्यान मारेगाव-मार्डी हा दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.सदर रस्त्यावरून चहुबाजूंनी मारेगाव शहराला जोडणाऱ्या गावातील नागरिकांची आवक शहरात अविरत सुरू असते.दररोज असंख्य विद्यार्थी याच रस्त्याने ज्ञानाचे धडे गिरवण्या करीता मारेगावात येत असतात.दरम्यान २४ तास गाड्यांचे ओझे आपल्या डोक्यावरून वाहणाऱ्या मारेगाव-मार्डी रस्त्यावरील खड्डे आठ दिवसाआधी बुजविण्यात आले होते.

परंतु आठ दिवसाआधी पुजविलेल्या खड्ड्यांनी पुनश्च एकदा तोंड उघडे केल्याने खड्डे बुजवण्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जनसामान्यातून याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.संबंधीत विभागाने सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.




