– ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेचा तालुक्यात फज्जा
– अनेकांच्या हाती लोटा ; ग्रामीण भागातील विदारक वास्तव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रत्येक गाव हागणदारी मुक्त व्हावे या अनुषंगाने ‘स्वच्छ भारत मिशन’ योजने अंतर्गत शासनाने कोट्यावधी रुपयाचे अनुदान देत घरोघरी शौचालये बांधण्यात आली.परंतु शंभर टक्के अनुदान प्राप्त होऊनही तालुक्यातील ग्रामीण भागात ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेचा फज्जा उडाला असुन सर्रास उघड्यावर शौचवारी सुरू असल्याचे विदारक वास्तव आहे.
शौचासाठी महिलांना शेतात किंवा गावाबाहेरील पांदण रस्त्यावर जावे लागू नये म्हणून ‘हागणदारी मुक्त गाव’ ही योजना राबविण्यात आली.दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना शौचालय उभारणीसाठी अनुदान देण्यात आले.
काहींनी यातून शौचालय बांधली तर काहींनी बांधलीच नाही.मिळालेले अनुदान पचवून हागणदारी मुक्त गाव योजनेला हरताळ फासत तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचवारी अजूनही सुरूच आहे.
शौचालये बांधण्यासाठी राज्य शासनाने लाखो रुपयांचे अनुदान दिले.शौचालये बांधली पण त्यांचा वापर ग्रामस्थ करीत नसल्याने ग्रामीण भागातील शौचालय ही फक्त शोभेची वास्तू बनून राहिली आहे.किंबहुना फक्त अनुदान रेटण्यासाठी शौचालये बांधली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
बांधलेल्या शौचालयांचा उपयोग ग्रामस्थ करतात की नाही याबाबत ग्रामपंचायती कडून कुठलीही पडताळणी केली जात नाही.परीणामी बांधलेली शौचालये अडगळीत पडून असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील विदारक परिस्थितीचे चित्र यावरून लक्षात येते की काही ठिकाणी शौचास जाण्यासाठी अंधाराची वाट पाहीली जाते.उघड्यावर शौचवारी सुरू असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असुन आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो.
तुर्तास या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मिळालेले अनुदान पचवून ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाती आजही टमरेल दिसून येत आहे.त्यामुळे बाहेर शौचवारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असून “तालुक्यात गुड मॉर्निंग” पथक पूर्ववत सक्रिय होणे गरजेचे आहे.





