– नागरिकांना नाहक त्रास
ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.त्या अनुषंगाने गाव खेड्यांना शहराला जोडता यावे म्हणून रस्ते बांधण्यात आले.परंतु तालुक्यातील मारेगाव-घोंसा रस्त्याची अवस्था अत्यंत द्यनीय झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
तालुक्यातील मारेगाव-घोंसा हा वर्दळीचा मार्ग असून वाहनांची सतत ये- जा या रस्त्यावरून अविरत सुरू असते.विशेष म्हणजे याच रस्त्यावर शहरातील आदर्श हायस्कूल,महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह,आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,एम. एस.ई.बी.कार्यालय,वन विभाग कार्यालय तसेच कैलासवासी दामोदर पंत आश्रम शाळा आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांसह कार्यालयीन कर्मचाऱी तसेच नागरिकांची वर्दळ या रस्त्यावरून सुरू असते.
परंतु गेल्या काही दिवसापासून सदर मार्गाची अवस्था बिकट झाली आहे.रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून याचा नाहक त्रास विद्यार्थी,कर्मचारी तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना होतो आहे.रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबंधित विभागाने सदर बाबीकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी सर्व स्तरावरून जोर धरत आहे.




