
– दीड लाखात महिलेला मध्य प्रदेशात विकले
– मारेगाव पोलीस पथक मध्यप्रदेशात रवाना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क: प्रफुल्ल ठाकरे
मारेगाव येथे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून दीड लाखात मध्य प्रदेशात विकल्याची धक्कादायक घटना २० एप्रिल रोजी उघडकीस आल्याने शहरात पुरती खळबळ उडाली आहे. सदर घटनेची तक्रार चंद्रपूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून घटनेचा तपास मारेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मारेगाव येथे वास्तव्य असलेल्या एका मध्यमवर्गीय महिलेला नोकरीचा लॉलीपॉप देत तिची मध्यप्रदेशात दीड लाखात विक्री केल्याची धक्कादायक घटना मुलीच्या आईने चंद्रपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर उघडकीस आली.
दिलेल्या तक्रारीनुसार रियाबाई व गहूकर (भद्रावती) हे दोघे काही दिवसापूर्वी महिलेला भेटले असता रग्गड पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महिलेच्या मुलीस भद्रावती येथे बोलविले.
नोकरी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असल्याचे महिलेस सांगण्यात आले. महिला तिथे गेल्यानंतर छिंदवासा जि.रतलाम येथील जितु पाली यास दीड लाखात महिलेची विक्री केल्याची तक्रार महिलेच्या आईने २० एप्रिल रोजी चंद्रपूर पोलीस स्टेशनला दाखल केली.
चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशनला संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास २१ एप्रिल रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
संशयित आरोपींच्या शोधार्थ मारेगाव पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात रवाना झाले असुन घटनेचा तपास मारेगाव पो.स्टे चे ठाणेदार राजेश पुरी यांचे सह ज्ञानेश्वर सावंत व पोलीस पथक करीत आहे.