
– मारेगाव शहरातील घटना
– साखर झोपेतील प्रशासनाला जाग कधी येणार…?
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे : मारेगाव
मारेगाव बस स्थानकाच्या पेंडींग प्रश्नाचे प्राणायाम सुरू असताना मारेगाव शहरात आज सकाळी ६ वाजता एक वेगळीच घटना उघडकीस आली. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियोजित जागी बस न थांबवता बस चालकाने काही अंतर पुढे नेऊन बस थांबवली. यावेळी प्रवाशांनी बस नियोजित जागी का थांबविली नाही…? असा जाब चालकाला विचारला असता चालकाने चक्क प्रवाशांशी हुज्जत घातली.हा वाद विकोपाला गेला असता काही सुज्ञ नागरिकांच्या मध्यस्थीने निवळला असला तरी प्रवाशांनी बसची वाट पाहत नेमके थांबायचे कुठे…? हा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत असून साखर झोपेतील प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार हे न सुटणारे कोडे होऊन बसले आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेले मारेगाव शहर शंभरावर गाव खेड्यांनी नटलेले आहे. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मारेगावात दररोज चहूबाजूंच्या परिसरातील नागरिकांची व प्रवाशांची मोठ्या संख्येने आवक असते. विद्यार्थी,कर्मचारी,जनसामान्य या ना त्या कामासाठी दररोज शहरात अथवा शहरातून प्रवास करतात.
परंतु तब्बल तीन दशकापासून मारेगावात बस स्थानक नाही. गत काही महिन्या आधी मारेगावात नवीन बस स्थानकाची जागा नियोजित करण्यात आली होती. नियमित बस थांब्या ऐवजी बस स्थानकाच्या नवीन नियोजित जागीच बस थांबवाव्या अशी सूचना विद्यमान आमदारांनी वणी आगार प्रमुखांना केली.परिणामी आगार प्रमुखांनी तडका फडकी आदेश काढून वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरून आवागमन करणाऱ्या बस वाहक व चालकांना सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.याची अंमलबजावणी ही झाली. परिणामी मारेगाव बस स्थानकाचा प्रश्न कायमचा सुटेल हे गोड स्वप्न मारेगावकर पाहू लागले होते.
परंतु सहा महिने उलटूनही बस स्थानकाच्या नियोजित जागी बी अँड सी क्वार्टर येथे एकही सुविधा दिसून आली नाही.ना पिण्याच्या पाण्याची सोय ना महिलांकरता प्रसाधनगृह.दिसून आली ती फक्त आणि फक्त प्रवाशांची धावपळ. ती सुद्धा ऊन पावसाच्या सरी झेलत.
दरम्यान २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता अंबाजोगाई-चंद्रपूर बसची काही प्रवासी प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागी म्हणजेच बस थांब्याच्या नियोजित जागी वाट पाहत उभे होते.बसचे आगमन होताच बस चालकांने बस नियोजित जागेपेक्षा पुढे नेऊन थांबवली.हातात बॅग व कमरेवर लहान मुलाचे ओझे पाहून येणाऱ्या प्रवाशांना ही गोष्ट पचनी पडली नाही. यावेळी नियोजीत जागी बस का थांबवली नाही…? असा सवाल प्रवाशांनी बस चालकास विचारला असता बस चालकाने “बस थांब्याची जागा तुम्ही उभी असलेली नसून मी बस थांबविली हीच आहे” अशी हुज्जत घातली. हा वाद विकोपाला जात असता काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडविला.
परंतु या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.व्यक्त होत नसले तरी प्रत्येक प्रवाशाच्या मनात आंदोलनाची धग पेटत आहे. आज निदर्शनास आलेली ही घटना पहिली नसून यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असल्याचे प्रवाशातून बोलले जात आहे.राज्य महामार्गाच्या खेळपट्टीवर आणखी नेमके धावायचे किती…? हा प्रश्न प्रवासी उपस्थित करू लागले आहे. तूर्तास साखर झोपेत असलेल्या प्रशासनाला याचे काही लेन देणे नसले तरी कोणत्याही क्षणी मारेगाव बस स्थानकासाठी मारेगावात आणखी एखादे अघोषित आंदोलन होण्याचा कयास नाकारता येणार नसल्याची चर्चा जनताजनार्दनात जोर धरू लागली आहे.
मारेगाव बस स्थानकाच्या अपडेट बाबत आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न लोकशस्त्रने केला असता आमदार साहेब नॉट रिस्पॉंडींग झाले होते . तुर्तास गणराज्य दिनापर्यंत भूमिपूजनाची तयारी दर्शविलेल्या मारेगाव बस स्थानकाचे घोडे नेमके अडले कुठे…? ही बाब जनसामान्यात चर्चिल्या जात आहे.