
♦विना निमंत्रणाचा पाहुणा आल्याने नागरिक त्रस्त
♦ लोकशास्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
गेल्या काही दिवसापासून मारेगाव शहरात माकडांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून शहरात सर्वत्र माकडांचा मुक्त संचार दिसून येत आहे.तर दुसरीकडे “विना निमंत्रणाचा पाहुणा” घरी आल्याने या पाहुण्यास हाकलून लावताना नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली असून जंगलातील पानवठे कोरडे पडायला सुरुवात झाली आहे.जंगलात वास्तव्य करणाऱ्या माकडांना पाण्याची कमतरता भासल्याने उन्हाळ्यात माकडे गावात अथवा शहरात प्रवेश करतात.सद्यस्थितीत असेच काहीसे चित्र मारेगाव शहरात दिसून येत आहे.पाणी आणि खाद्याच्या शोधात माकडे या घरावरून त्या घरावर उड्या मारत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यात गृहिणींची वेगळीच अडचण असून उन्हाळी पदार्थ घरावर वाळू घातलेले असताना हा विना निमंत्रणाचा पाहूना मात्र त्यावर “मनसोक्त” ताव मारताना दिसून येत आहे.”माकडांचे ऍथलेटिझम” पाहून बच्चे कंपनीचे मनोरंजन होत असले तरी एखादे माकड घरात शिरून अथवा रस्त्यावरती अचानक एखाद्या वाहनास आडवे येऊन छोटा मोठा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.संबंधित विभागाने सदर बाबीकडे लक्ष देऊन माकडांना पाणी व खाद्य जंगलातच उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शहरवासीयांकडून जोर धरू लागली आहे.