
♦विषारी औषध प्राशन करून संपवली जीवनयात्रा
-लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
चोपन येथील एका युवा शेतकऱ्याने सततच्या नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना ता.२२ मार्च रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान उघडकीस आली.
प्रवीन महादेव खिरटकर (३७) रा.चोपन हा शेती सह रोज मजुरी करून जीवन जगत होते.परंतु गेल्या काही वर्षांपासून होत असलेली सततची नापिकी व उत्पन्नात होत असलेली घट यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते.आज सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात गुराढोरांना चारा पाणी देण्यासाठी गेले असता शेतात असलेल्या बंड्यात ठेवून असलेले विषारी औषध त्यांनी प्राशन केले.त्यांचा भाऊ शेतात गेला असता त्यांना प्रवीण शेतातील बंड्यात निपचित पडून असल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रवीण यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करीता दाखल केले.
प्रकृती चिंताजनक असल्याने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातून प्रवीण यांस पुढील उपचारार्थ वणी येथे हलविण्यात आले असता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.प्रवीण यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ,पुतण्या असा आप्त परिवार आहे.
समाजमन सुन्न…
ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी एका युवा शेतकऱ्यांने केलेल्या आत्महत्ये मुळे समाजमन सुन्न झाले असून खीरटकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.