
– ‘ले पंगात’ ३६ संघांचा सहभाग
– चुरशीच्या अंतिम लढतीत अकोला ‘अजिंक्य’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्थानिक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात येथील शारीरिक शिक्षण विभागाद्वारा पुरुषांच्या विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.१६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत ३६ संघांनी सहभाग नोंदवला होता.यात अंतीम सामना काबीज करुन श्री.धाबेकर कला महाविद्यालय,अकोला (खडकी) संघ अजिंक्य ठरला.परिणामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांचे हस्ते विजेत्या संघास चषक देऊन गौरविण्यात आले.
मारेगाव वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यापीठ स्तरीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा थाटात पार पडल्या. या स्पर्धांत अनेक चुरशीचे सामने झाले. हे कबड्डीचे सामने म्हणजेच मारेगावकरांसाठी आनंदाची पर्वणीच ठरली.
समारोपीय समारंभात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे बोलत असताना म्हणाले ‘व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे.आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते.त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे.हे तंत्र क्रीडा विभागाने अत्यंत कुशलतेने हाताळले तसेच स्पर्धेत भाग घेणारे संघ , त्यांचे खेळाडू , उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजनपूर्वक यशस्वीपणे राबविण्याचे सर्व श्रेय महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा.डॉ.नितेश राऊत व इतर सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाते…!’
या स्पर्धात राहण्यापासून ते जेवणापर्यंतच्या सर्व व्यवस्थांचेही उपस्थित महाविद्यालयांच्या शारीरिक शिक्षण विभाग संबंधितांनी कौतुक केले. सदर स्पर्धा नियोजित वेळत पार पडण्यास पंच म्हणून निलेश झाडे, सतीश तेडेवार, निलेश तारक, किरण मडावी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली व महाविद्यालयाद्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनातून सदर स्पर्धा अत्यंत चोखपणे यशस्वीरित्या पार पडली व सदर स्पर्धेस मारेगाव वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांची मेहनत कामी आली.