
— अर्जुनी येथील तलावरील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अर्जुनी येथे उन्हाळी सुट्ट्या घालवण्याकरीता आजोळी आलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ता. २५ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव राकेश मोहन आत्राम (१६) रा. कुटकी ता. हिंगणघाट जि.वर्धा येथे वास्तव्यास असुन तो वर्ग ९ मध्ये शिकत होता. शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे तो काही दिवसापासून अर्जुनी येथे आजोबाकडे सुट्ट्या घालवण्याकरीता आला होता.
दरम्यान ता.२५ मे रोजी सकाळी आजोबा बाहेरगावी गेल्याने मृतक राकेश बैलांना पाणी पाजण्यासाठी अर्जुनी येथील तलावाकडे घेऊन गेला. मात्र काळ राकेशची वाट पाहत होता. बैलांना पाणी पाजतानाच राकेशचा पाय घसरला व तो तलावातील गाळात फसला. त्याला कुठलीही हालचाल करता आली नसल्याने राकेशचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. राकेश बराच वेळ झाला घरी परतला नाही म्हणून कुटुंबीय तथा ग्रामस्थ शोध घेण्यासाठी तलावाकडे गेले असता तलावाच्या गाळात फसलेला राकेशचा मृतदेह आढळला.
सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा प्राप्त परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात जमादार दिगंबर कनाके करीत आहे.