
♦सुधारीत नियम कागदोपत्रीच…
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मोटर वाहन कायद्यात केंद्र शासनाने केलेला बदल राज्यानेही स्वीकारला आहे.या कायद्याची अंमलबजावणी एक डिसेंबर २०२१ पासून राज्यात सुरू झाली. नव्या बदलात केवळ दंडाची रक्कम वाढली नाही तर अठरा वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना आढळल्यास थेट त्यांच्या पालकावर कारवाई करण्याची तरतूद आहे.
या स्थितीत पालकांना तीन महिन्यांची कैद होऊ शकते.असे असताना गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत “किती अल्पवयीन वाहन चालकांवर संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात आली” हा संशोधनाचा विषय होऊन बसलाय.शहरासह तालुक्यात अल्पवयीनांच्या हाती मोठ्या प्रमाणात वाहने दिसून येत असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघाताच्या घटनांमध्ये घट व्हावी म्हणून प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे.यासाठी केंद्र शासनाकडून वाहतुकीच्या नियमात बदल करून दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आली.दरम्यान केंद्राच्या धर्तीवरच राज्यातही वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देशित केले होते.
डिसेंबर २०२१ पासून राज्यात वाहतुकीच्या नवीन सुधारित नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली.चारचाकीत मुलांसाठी वेगळे असं अनिवार्य करण्यात आले असतानाच नव्या बदलात अठरा वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी वाहन चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तीन महिन्यांची कैद किंवा २५ हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली.तसेच वर्षभरासाठी सदर वाहनाची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले.शिवाय पाल्याला सुद्धा बालसुधारगृहात पाठवण्याची तरतूद या नियमात आहे.
वाहने हळू चालवा,वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा इतकेच नाही तर वाहनावर बसलेल्या मागील व्यक्तीला सुद्धा हेल्मेट सक्तीचे केले असताना सर्व सुधारित नियमांना बगल देण्याचा प्रकार तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी दिसत असताना संबंधित विभाग याकडे जराही लक्ष का देत नाही हे न उलगडणारेच कोडे असुन आता मार्च महिन्यात मात्र “वसुलीचा तगादा” लावत जनसामान्यांना नाहक त्रास दिला जाणार हे निश्चित.