
– मारेगाव येथील घटना
– दोन्ही चालकांचा पोलीस स्टेशन समोर राडा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी मार्गे येणाऱ्या एका ट्रकने पाणी वाहून नेणाऱ्या एका चार चाकीला कट मारल्याने चार चाकी उलटल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजे दरम्यान शहरातील पोलीस स्टेशन समोर घडली.यावेळी दोन्ही वाहन चालकात फिल्मी स्टाईल राडा झाल्याने शेकडो बघ्यांची गर्दी उसळली होती.
शहरातील सतीश मस्की यांचा आरो वॉटर प्लांट असून ते रोज आपल्या चारचाकीने शहरातील विविध प्रभागात पाणीपुरवठा करतात.
दरम्यान १४ मे रोजी सकाळी सात वाजे दरम्यान शहरातील पोलीस स्टेशन समोरून जाताना वणी मार्गे येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या चार चाकीला जोरदार कट मारला. यात त्यांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांचे वाहन पलटी होत त्यातील दोन पाण्याच्या टाक्यांचा चुराडा होत त्यांच्या चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.
यावेळी संतप्त पाणी वाहक चारचाकी चालकाने ट्रक चालकास ट्रक मधून खाली ओढत जाब विचारला असता दोन्ही चालकात शेकडो बघ्यांच्या गर्दीत रोडवरती फिल्मी स्टाईल राडा झाल्याने काही वेळ वाहतूक प्रभावीत झाली होती.वृत्त लिहीपर्यंत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.