
– पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी
– लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथुन वाहणाऱ्या वर्धा नदीवर असलेले निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ “झुंजाई धबधबा” हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधिंच्या दुर्लक्षित धोरणाचे “शापित सौंदर्यच” म्हणावे लागेल.या ठिकाणी सोयी सुविधाचा अभाव असल्याने पर्यटन स्थळ बनण्यास अडथळा निर्माण झाला असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.
मारेगाव तालुक्यात चिंचमंडळ या गावापासून उत्तरेस ४ किमी अंतरावर वर्धा नदीवर असलेला हा “झुंजाई धबधबा” पर्यटन स्थळ म्हणून यवतमाळ ,वर्धा ,चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिध्द आहे. नदीचे रुंद पात्र, भव्य धबधबा, वनराईने नटलेले ठीकाण, निसर्गरम्य वातावरण, व काही अंतरावर असलेले पुरातन वडकेश्वर देवस्थान यामुळे या ठिकाणाकडे पर्यटक आकर्षीत होत असतात.
सुट्टीच्या दिवशी अनेक कुटुंबीय परिवारासह या निसर्गरम्य स्थळी जावुन मानसिक शांतीचा सुखद आनंद घेतात. परंतु या ठीकाणी कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो.या ठीकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या व “झुंजाई धबधबा” म्हणुन प्रसिद्ध असलेल्या या निसर्ग रम्य स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन सौंदर्यिकरण केले तर एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ शकते. यासाठी या भागातील लोकप्रतिनिधि व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.