
— प्रशासनाची दोन वर्षापासून होतेय डोळेझाक
— अन्यथा आमरण उपोषण, पाथरी येथील शेतकऱ्यांनी दिला ईशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
सन २०२१-२२ या वित्तीय वर्षात भालेवाडी येथील मंजुर शेत पांदन रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी मागील दोन वर्षापासून प्रशासन डोळेझाक करीत आहे. या पांदन रस्त्यासाठी भालेवाडी येथील शेतकरी वारंवार निवेदने तथा मौखिक विनंती करुनही प्रशासना कडुन कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नसल्याने भालेवाडी शिवारातील पाथरी येथील शेतकऱ्यांनी, वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना पांदन रस्ता तत्काळ दुरुस्त करा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
तालुक्यात अनेक पानंद रस्ते प्रशासनाला लेखी वा मौखिक सांगुन सुध्दा या पानंद रस्त्याचे मजबुतीकरन करण्यात आले नाही. त्यामूळे शेतकऱ्यांना शेतात जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात हे रस्ते अतिशय चिखलमय होत असल्याने या मार्गाने साधे पायदळ चालत जाणे कठीण होते. यावर्षी तर आजही काही पानंद रस्त्यावर अती पावसामुळे कमी अधिक प्रमाणात चिखल असल्याने शेतात काम करायला मजुर मिळत नाही, जनावरे सुध्दा चिखलात फसतात, त्यामुळे पावसाळ्यात शेतीचे कामे कशी करावी हा प्रश्न या शेतकऱ्यासमोर निर्माण होतो.
या पांदन रस्त्यापैकी भालेवाडी येथील एक किलोमिटर लांबीचा पांदन रस्ता ०३/०३/ २०२२ ला मातोश्री ग्राम समृध्द योजनेंतर्गत मंजुर करण्यात आला. मात्र जुलै २०२४ पर्यंत सदर पांदन रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले नाही. या दोन वर्षांत प्रशासनास अनेकदा मौखिक व लेखी निवेदने देण्यात आली. परंतु सरकारी काम अन् बारा महिने थांब ही म्हण सार्थ ठरवत या पांदन रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या गेले. शेवटी शेती कशी करावी हा प्रश्न शेतकर्यांसाठी महत्वाचा असल्याने, पाथरी येथील शेतकर्यांनी वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देत व्यथा व्यक्त करुन पांदन रस्त्याचे तत्काळ मजबुतीकरण करण्यासाठी साकडे घातले. जर मजबुतीकरण करण्यात आले नाही तर मंगळवार ता.२३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भालेवाडी येथील सुधाकर बोढे यांच्या शेताजवळ सर्व शेतकरी आमरण उपोषणाला बसणार असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देते वेळी अस्मिता चेंडे, भाग्यश्री वैरागडे, मनिषा दर्वे, रुचिका दर्वे, वंदना मत्ते, संगीता वैरागडे, दिलीप दर्वे, मोरेश्वर चेंडे, प्रदीप दर्वे, संजय दर्वे यांचेसह अनेक शेतकरी शेतमजुर उपस्थित होते.