
– आमदारांसह भाजप कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
– ठाणेदारांच्या समर्थनार्थ मनसे-काँग्रेसचे निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत काही अतिरिक्त वेळ लागला असता मारेगाव ठाणेदारांनी मारहाण केल्याची तोंडी तक्रार नगरसेवकाने दाखल केली.परिणामी ठाणेदारांची मारेगावातुन तात्काळ उचल बांगडी करा ही मागणी रेटून धरत आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी कार्यकर्त्यांसह ता .२८ ऑक्टोबर रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात ६ ते ७ ठिय्या मांडला.तर दुसरीकडे मारेगाव ठाणेदारांच्या समर्थनार्थ मनसे,काँग्रेसने निवेदन देत प्रकरणात उडी घेतली.तूर्तास सीसीटीव्ही फुटेज तपासणी नंतरच सदर प्रकरण उलगडणार असुन जनसामान्यात मात्र ‘कर्तव्य श्रेष्ठ की पद’ हा चर्चेचा विषय बनला आहे.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १६ मधील आदिशक्तीची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी निघाली होती. सदर मंडळाकडे दुर्गा उत्सव मंडळाची रीतसर परवानगी नसतानाही मारेगाव पोलिसांनी मिरवणुक विहित वेळेत संपवावी असा तोंडी आदेश दिला.यावेळी मिरवणुकीतील युवकांनी १५ ते २० मिनिटांचा अधिकचा वेळ मागितला असता अतिरिक्त वेळ देण्यात आला.
दिलेल्या अतिरिक्त वेळेत वेळेत मिरवणुकीची सांगता करा…असा आदेश मारेगाव ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी दुर्गा उत्सव मंडळास दिला. यावरून बाचाबाचीही झाल्याची माहिती आहे.दरम्यान प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेवक राहुल राठोड पोलीस ठाण्यात धडकले.यावेळी ठाणेदारांनी अनावश्यक प्रश्न विचारून मला जबर मारहाण केली असे नगरसेवकाचे सांगणे आहे.
मिरवणूक पूर्णत्वास जाऊन दुसऱ्या दिवशी शनिवारला या गोष्टीचे पडसाद शहरात उमटले.भाजप आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सहा ते सात तास मारेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.यावेळी ठाणेदारांची तात्काळ उचल बांगडी करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू ही मागणी त्यांनी रेटून धरली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आमदारांनी संपर्क केला असता, सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य निर्णय घेऊ तसेच सदर प्रकरणाच्या चौकशी करिता एक समिती गठित करून प्रकरणाची योग्य दिशेने चौकशी करू असे अभिवचन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले.
दरम्यान मारेगाव ठाणेदारांची बदली करू नये अशा आशयाचे निवेदन मनसे,काँग्रेस आदी अनेक संघटनांनी मारेगाव ठाण्यात दिले. राजकीय लालसेपोटी खोट्या तक्रारी देऊन ठाणेदारांची जाणीवपूर्वक बदली करण्याचे हे षडयंत्र असल्याची बाब सदर निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
काँग्रेस निवेदनावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारुती गौरकार ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, नगरसेवक आकाश बदकी, अंकुश माफुर, समिर कुडमेथे, रॉयल सय्यद, समिर सैय्यद तथा काँग्रेस कार्यकर्त्यांचा फौजफाटा उपस्थित होता.
तर मनसे निवेदन देतेवेळी नगरसेवक अनिल गेडाम, नबी शेख, शहराध्यक्ष चांद बहादे गजानन चंदनखेडे यांचेसह असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते.
एकीकडे आमदारांसह भाजप कार्यकर्त्यांचा ताफा ठाणेदारांच्या उचल बांगडीची मागणी करत असताना दुसरीकडे ठाणेदारांच्या समर्थनार्थ अनेक निवेदने दाखल झाल्याने तूर्तास हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते..? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार असुन यातुनच ‘कर्तव्य श्रेष्ठ की पद’ या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.