
-विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ‘पुर्णविराम’
-प्रशासकीय कामे ठप्प
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
‘जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी’ या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तब्बल १८ लाख शासकीय व निमशासकीय कर्मच्याऱ्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले असुन आज सलग पाचव्या दिवशी संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असतानाच प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने ‘कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि जनसामान्यांना टेन्शन’ असे म्हणावयाची वेळ येऊन पडली आहे.
राज्य सरकारी,निमसरकारी कर्मचारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,भूमि अभिलेख तसेच आरोग्य विभाग यासह सर्व संघटना संपात एकवटल्या असून एम.पी.एस रद्द करून ‘जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी’ या प्रमुख मागणी सह तालुक्यातील कर्मचारी वर्ग तहसील कार्यालय मारेगाव येथे एकवटला आहे.
दरम्यान आज संपाचा सलग पाचवा दिवस असून ऐन परीक्षेच्या काळात सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्याचा ‘छुपा सुर’ सर्वसामान्यांत उमटु लागला असुन ‘आपल्या पाल्याच्या भवितव्या’ बाबत ‘पालक वर्ग’ कमालीचा चिंतीत दिसत आहे.
आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने मार्च महिन्यात अनेक शासकीय कामासह सर्वसामान्याची कामे मार्गी लावली जातात.परंतु गेल्या पाच दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या ‘नॉन स्टॉप’ सुरू असलेल्या संपामुळे कोणतेही काम पूर्णत्वास गेले नाही.विद्यार्थ्यां अभावी तालुक्यातील शाळा ओस पडल्या असुन शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे.